वसमतमध्ये शैक्षणिक इतिहास रचला! ‘राजू भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान’च्या उपक्रमात एकाच दिवशी ४७०० विद्यार्थ्यांनी दिली नवोदय सराव परीक्षा; तासाभरात निकाल जाहीर! एक दिवस, ४७०० विद्यार्थी आणि महाराष्ट्रात नवा विक्रम!
हरनामसिंग चव्हाण

वसमतमध्ये शैक्षणिक इतिहास रचला! ‘राजू भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान’च्या उपक्रमात एकाच दिवशी ४७०० विद्यार्थ्यांनी दिली नवोदय सराव परीक्षा; तासाभरात निकाल जाहीर!
एक दिवस, ४७०० विद्यार्थी आणि महाराष्ट्रात नवा विक्रम!
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
वसमत, दि. १ नोव्हेंबर (प्रतिनिधी):
ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारा आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक नवा आदर्श ठरलेला जिल्हास्तरीय मोफत नवोदय सराव परीक्षा २०२६ चा महाकुंभ आज वसमतमध्ये ऐतिहासिक उत्साहात पार पडला. राजू भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या उपक्रमाच्या सातव्या वर्षाने वसमतच्या शैक्षणिक इतिहासात एक नवीन सुवर्णपान जोडले आहे. लाल बहादूर शास्त्री विद्यालयात पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात मराठी, इंग्रजी आणि उर्दू या तिन्ही माध्यमांच्या तब्बल ४,७०० विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी परीक्षा देऊन नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
काय आहेत या महा-उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये?
पूर्णपणे मोफत साहित्य: गरीब विद्यार्थ्यांवर कोणताही आर्थिक भार पडू नये, म्हणून संस्थेच्या वतीने पॅड, पेन, ओ.एम.आर. (OMR) उत्तरपत्रिका आणि तज्ज्ञ शिक्षकांनी तयार केलेला उच्च दर्जाचा प्रश्नसंच पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आला.
विक्रमी नियोजन (१५६ वर्गखोल्या): ४,७०० विद्यार्थ्यांच्या बंम्पर उपस्थितीसाठी तब्बल १५६ परीक्षा कक्षांची चोख व्यवस्था करण्यात आली होती. शिस्तीसाठी १६५ पर्यवेक्षक, ४० स्वयंसेवक शिक्षक आणि २७ संगणक तज्ज्ञांची फौज दिवसभर कार्यरत होती.
महाराष्ट्रात एकमेव असा ‘तासाभरात निकाल’: या संपूर्ण उपक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे परीक्षा संपल्यानंतर अवघ्या एका तासात निकाल जाहीर करण्यात आला! आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत संगणक तज्ज्ञांनी OMR शीट्सची तात्काळ तपासणी करून विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता आणि अभ्यासातील उणिवा जागेवरच समजावून सांगितल्या. महाराष्ट्रात असा उपक्रम राबवणारी ही एकमेव संस्था ठरली आहे.
सात वर्षांची अखंड तपस्या: आमदार राजू भैय्या नवघरे यांनी २०१९ मध्ये सुरू केलेली ही शैक्षणिक चळवळ कोरोना महामारीच्या कठीण काळातही खंडित होऊ दिली नाही. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षण असो वा दुष्काळात शेतकऱ्यांच्या मुलांना दिलेला आधार असो, ही चळवळ सातत्याने गती घेत आहे.
विद्यार्थ्यांच्या अल्पोपहाराची विशेष काळजी
परीक्षा दिल्यानंतर कोणताही विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी संस्थेच्या वतीने सर्व ४,७०० विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत आलेल्या पालकांसाठी भव्य अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. राजकारणा पलीकडे जाऊन समाजहित कसे जोपासावे, याचे उत्तम उदाहरण याप्रसंगी पाहायला मिळाले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेतलेली ही मेहनत आणि प्रतिष्ठानचे नियोजन पाहून उपस्थितांचे डोळे दीपले. हा ऐतिहासिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, स्वयंसेवक आणि प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद ठरले.
“केवळ घोषणा नव्हे, तर कृतीतून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा हा उपक्रम म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरला आहे.” – पालकांची भावूक प्रतिक्रिया.
छाया नागेश चव्हाण, वसमत

