हिंगोलीत ८० वा स्वातंत्र्य दिन पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते ध्वजारोहण; उल्लेखनीय कार्याबद्दल गुणवंतांचा जिल्हास्तरीय युवा पुरस्काराने गौरव!
मुख्य संपादक: हरणामसिंग चव्हाण

हिंगोलीत ८० वा स्वातंत्र्य दिन पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते ध्वजारोहण; उल्लेखनीय कार्याबद्दल गुणवंतांचा जिल्हास्तरीय युवा पुरस्काराने गौरव!

लोकमंच टाईम्स: हरणामसिंग चव्हाण
हिंगोली:
भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन आज, शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा भव्य सोहळा पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या शुभहस्ते तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सन २०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीतील उत्कृष्ट कार्याबद्दल ‘जिल्हास्तरीय युवा पुरस्कारां’ची घोषणा करण्यात आली. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण आणि युवक विकास क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या तीन तरुण आणि एका सामाजिक संस्थेचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या दिमाखदार सोहळ्यास जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती:
प्रशासकीय अधिकारी: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, आयुक्त संजय काटकर
लोकप्रतिनिधी राज्यसभा खासदार रामरावजी वडकुले, लोकसभा खासदार नागेश पाटील आष्टीकर
आमदार प्रज्ञाताई सातव, तानाजीराव मुटकुळे, राजूभैय्या नवघरे , संतोषदादा बांगर
इतर मान्यवर नगराध्यक्षा रेखाताई बांगर, नितीन तडल, डॉ. कैलास शेळके यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिक, स्वातंत्र्यसैनिक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाचा आणि युवा शक्तीचा गौरव करण्यात आला. देशभक्तीपर गीतांची धून आणि भारत माता की जयच्या घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

