दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कासोबत प्रवेश शुल्क १००% माफ करा! अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन; तीव्र जनआंदोलनाचा इशारा
हरनामसिंग चव्हाण

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कासोबत प्रवेश शुल्क १००% माफ करा!
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन; तीव्र जनआंदोलनाचा इशारा
लोकमंच टाईम्स मुख्य संपादक : हरनामसिंग चव्हाण
वसमत:
महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम २०२६ मधील Trigger-1 लागू झालेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा शुल्क माफ करून दुष्काळग्रस्त शेतकरी व विद्यार्थ्यांच्या जखमेवर अर्धवट मलमपट्टी केली आहे. परीक्षा शुल्कासोबतच शाळा आणि महाविद्यालयांचे प्रवेश शुल्क (Admission Fees) १०० टक्के माफ करावे, अशी जोरदार मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने वसमत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कागदी आश्वासने नकोत, प्रत्यक्ष आर्थिक दिलासा द्या!
महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयातील (जीआर) मुद्दा क्रमांक ५ अन्वये विद्यार्थ्यांच्या केवळ परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे. परंतु, आज शेतात उत्पन्न नाही, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंब प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा स्थितीत शिक्षणासाठी प्रवेश शुल्काच्या नावाखाली पालकांच्या खिशावर मारली जाणारी आर्थिक कुऱ्हाड थांबवणे अत्यंत गरजेचे आहे.
“एका हाताने मदतीची घोषणा करायची आणि दुसऱ्या हाताने प्रवेश शुल्क उकळायचे, हा कसला दिलासा? परीक्षा शुल्क माफ करून विद्यार्थ्याला परीक्षेपर्यंत आणायचे आणि प्रवेश शुल्काअभावी त्याला शिक्षणाच्या दारातच रोखायचे, हा विरोधाभास शासनाने तातडीने दूर करावा.”
— आनंद खरे (प्रदेश कार्याध्यक्ष)
प्रमुख मागण्या:
शासन निर्णयात सुधारणा: मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. ५ मध्ये तातडीने दुरुस्ती करून परीक्षा शुल्कासोबत १००% प्रवेश शुल्क माफीचा स्पष्ट समावेश करण्यात यावा.
वसूल केलेले शुल्क परत करा: सर्व शाळा व महाविद्यालयांना प्रवेश शुल्क न आकारण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत. ज्या संस्थांनी यापूर्वी प्रवेश शुल्क वसूल केले आहे, ते विद्यार्थ्यांना तत्काळ परत करण्यात यावे.
शैक्षणिक संरक्षण: आर्थिक अडचणींमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी ठोस व अंमलबजावणीयोग्य आदेश जारी करावेत.
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा
शिक्षण हा केवळ श्रीमंतांचा विशेषाधिकार नसून शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मुलांनाही शिक्षणाचा समान अधिकार आहे. दुष्काळात जळालेल्या शेतीमुळे पिचलेल्या शेतकऱ्याच्या मुलांसाठी ही फी माफी म्हणजे उपकार नसून शैक्षणिक संरक्षण आहे.
शासनाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ न थांबवल्यास संघटनेच्या वतीने संविधानिक व लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
हे निवेदन देतेवेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद खरे, ज्येष्ठ पत्रकार मुनिरोद्दीन फारुखी आणि प्रकाश दवणे उपस्थित होते.

