इंदुरा सी.बी.एस.ई. शाळेत ‘विद्यार्थी संसद’ स्थापन; लोकशाहीचे धडे अन् १८ बालप्रतिनिधींचा शपथविधी संपन्न!
मुख्य संपादक हरणामसिंग चव्हाण

इंदुरा सी.बी.एस.ई. शाळेत ‘विद्यार्थी संसद’ स्थापन; लोकशाहीचे धडे अन् १८ बालप्रतिनिधींचा शपथविधी संपन्न!
वसमत , लोकमंच टाईम्स छाया: नागेश चव्हाण
वसमत तालुक्यातील इंदुरा सी.बी.एस.ई. शाळेत विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि लोकशाही मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी अत्यंत उत्साहात ‘विद्यार्थी संसद’ स्थापन करण्यात आली. ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदानाद्वारे आपल्या प्रतिनिधींची निवड केली असून, निवड झालेल्या सर्व १८ बालप्रतिनिधींना आज शिस्त आणि निष्ठेची शपथ देऊन पददान करण्यात आले.
लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव अन् ६१ उमेदवारांची स्पर्धा
या विद्यार्थी संसदेतील विविध १८ पदांसाठी ६ वी ते १० वीच्या तब्बल ६१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मतदानापूर्वी सर्व उमेदवारांनी, निवड झाल्यावर शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी काय करणार, याचे नियोजन मांडले. यानंतर ६ वी ते १० वीच्या एकूण ४१७ विद्यार्थ्यांनी गुप्त मतदान पद्धतीचा वापर करून आपला मतदानाचा हक्क बजावला.
API श्री. पुणे साहेबांच्या हस्ते पददान व मार्गदर्शक सूचना
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशनचे स.पो.नि. (API) श्री. पुणे साहेब उपस्थित होते. त्यांच्या हस्तेच सर्व १८ नवनिर्वाचित बालप्रतिनिधींना पदाची शपथ देण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना पुणे साहेब म्हणाले, “शाळा राबवत असलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शिस्त अंगी बाळगून देशाचे आदर्श नागरिक बनले पाहिजे. या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे.”
पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून मूल्यांची रुजवणूक: कैलास पानखडे
प्रास्ताविकात संस्थेचे सचिव कैलास पानखडे सर यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की, “लोकशाहीची मूल्ये ही केवळ पुस्तके वाचून कळत नाहीत, तर अशा प्रत्यक्ष उपक्रमांतून ती मनात रुजतात. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, जबाबदारीची जाणीव व्हावी आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, याच उद्देशाने ही विद्यार्थी संसद स्थापन करण्यात आली आहे.”
स्कॉलरशिप गुणवंतांचा विशेष सत्कार
पददान समारंभानंतर शाळेतील ४ थी व ७ वीच्या स्कॉलरशिप परीक्षेत पात्र ठरलेल्या २० गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
असे झाले संयोजन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रावणी ढोरे व वैष्णवी दळवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. पुजा गुड्डलवार मॅडम यांनी मानले. क्रीडा शिक्षक श्री. निसार सर व श्री. गायकवाड सर यांनी शिस्तीचे नियोजन सांभाळले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य तांबारे सर, उपप्राचार्य खाकरे सर, पवार सर व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या या उपक्रमाबद्दल पालकांनी अत्यंत समाधान व्यक्त केले आहे.

