वसमत येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात; २२ रुग्णांवर नांदेड येथे होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन; १०७ नागरिकांनी घेतला लाभ
हरनामसिंग चव्हाण

वसमत येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात; २२ रुग्णांवर नांदेड येथे होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन; १०७ नागरिकांनी घेतला लाभ
लोकमंच टाईम्स
वसमत : मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून एसएमबी ग्रुप, लायन्स क्लब ऑफ वसमत प्राईड आणि कामगार कल्याण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वसमत येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण १०७ जणांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी २२ रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळून आला असून, त्यांच्यावर नांदेड येथील लायन्स नेत्र रुग्णालयात पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
शिबिराचे दिमाखदार उद्घाटन वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी बोलताना आमदार नवघरे यांनी, आर्थिक अडचणींमुळे आरोग्य उपचारांपासून वंचित राहणाऱ्या गरजू नागरिकांपर्यंत थेट आरोग्यसेवा पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे सांगत आयोजकांच्या या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांना पूर्ण पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजीराव बेंडे, राजू भैया नवघरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे, माजी नगरसेवक मोबीन भाई, एसएमबी ग्रुपचे सय्यद गौस, कामगार कल्याण मंडळाचे साखरे साहेब, लायन्स क्लब ऑफ वसमत प्राईडचे अध्यक्ष संजीवकुमार बेंडके, माजी अध्यक्ष राजू सिद्दिकी, उपाध्यक्ष मोहम्मद गौस बागवान, समीर कुरेशी, अंबादास मनी, प्रसाद लालपोतू व विजय लांडगु यांच्यासह विविध क्षेत्रांतील गणमान्य उपस्थित होते.
मसूद भाईंचा पुढाकार आणि सामाजिक बांधिलकी
हे शिबिर एसएमबी ग्रुपचे सर्वेसर्वा मसूद भाई यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सर्व १०७ नागरिकांची सखोल तपासणी करून २२ मोतीबिंदू रुग्णांना पुढील मोफत उपचारांसाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, तसेच रिजवान भाई, सय्यद काशीद, सय्यद फैजान, सय्यद रेहान, शेख कामरान आणि एसएमबी ग्रुप व कामगार कल्याण केंद्राच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मस्के सर यांनी केले, तर भविष्यातही अशाच लोकोपयोगी आरोग्य योजना राबवणार असल्याचा मनोदय अध्यक्ष संजीवकुमार बेंडके यांनी व्यक्त केला.

