हिंगोली जिल्ह्यासाठी मोठा दिलासा! सर्व ५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; वसमतचे नाव वगळल्याची अफवा अखेर खोडून काढली
लोकमंच टाईम्स विशेष वृत्त / हरनामसिंग चव्हाण

हिंगोली जिल्ह्यासाठी मोठा दिलासा! सर्व ५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; वसमतचे नाव वगळल्याची अफवा अखेर खोडून काढली
लोकमंच टाईम्स विशेष वृत्त / हरनामसिंग चव्हाण
हिंगोली:
खरीप हंगाम २०२६ मधील पावसाची तूट आणि निर्माण झालेली टंचाई लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाची पहिली कळ (Trigger-1) लागू करण्यात आली असून, यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ तालुक्यांचा (हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत) समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशियल मीडियावर राजकीय हेतूने “वसमतचे नाव दुष्काळग्रस्त यादीतून वगळले गेले” अशी चुकीची माहिती आणि अफवा वेगाने पसरवली जात होती. मात्र, शासनाच्या अधिकृत निर्णयामुळे या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला असून सत्य समोर आले आहे. आमदार राजूभैय्या नवघरे यांनी वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती मिळवून देण्यासाठी दिलेला शब्द शेवटी खरा ठरला असून, वसमतसह संपूर्ण जिल्ह्याला दुष्काळाच्या पहिल्या टप्प्यातील सवलतींचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यात लागू झालेल्या प्रमुख सवलती व उपाययोजना:
कृषी आयुक्तांच्या २४ सप्टेंबर २०२६ च्या अहवालानुसार जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याअंतर्गत खालील सवलती तात्काळ लागू होत आहेत:
शेतकऱ्यांना कर्ज व महसुलात दिलासा: बाधित भागातील शेतकऱ्यांच्या जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जांच्या वसुलीस स्थगिती.
कृषी पंप वीज बिलात सूट ७.५ हॉर्सपावरपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीज बिलात सूट; तसेच टंचाई काळात कोणत्याही शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करण्याचे स्पष्ट निर्देश.
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी: बाधित भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात संपूर्ण माफी.
रोजगार व टँकर पाणीपुरवठा: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MGNREGA) निकषांत शिथिलता आणून जास्तीत जास्त हातांना काम दिले जाईल. गरजेनुसार पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू केले जातील.
चारा, अन्नधान्य व जलसंधारण शेतकरी व मजुरांसाठी अन्नधान्याची टंचाई भासू न देणे, जनावरांसाठी चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करणे तसेच जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश.
अहवाल सादर झाल्यानंतर मिळणार प्रत्यक्ष आर्थिक मदत
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जीपीएस कोऑर्डिनेट (GPS coordinates) आणि शेतातील पिकांच्या प्रत्यक्ष छायाचित्रांसह पंचनाम्यांचा सविस्तर अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठवला जाईल. हा अहवाल शासनास प्राप्त झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतपिकांच्या नुकसानीची आर्थिक मदत वितरित करण्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय जारी केला जाईल.
विरोधी किंवा गैरसमज पसरवणाऱ्या घटकांनी पसरवलेल्या अफवांना बळी न पडता, शासकीय आदेशानुसार वसमतसह जिल्ह्यातील सर्व शेतकरी या सर्व सवलतींसाठी पात्र ठरले असल्याचे या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे.

