कुरुंद्यात स्मार्ट मीटरविरोधात असंतोषाचा भडका: 33 KV कार्यालयावर धडक मोर्चा, 1 सप्टेंबरचा अल्टिमेटम!
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

कुरुंद्यात स्मार्ट मीटरविरोधात असंतोषाचा भडका: 33 KV कार्यालयावर धडक मोर्चा, 1 सप्टेंबरचा अल्टिमेटम!
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
कुरुंदा (हिंगोली):
स्मार्ट मीटरच्या नावाखाली होणारी मनमानी आणि वाढीव वीजबिलांच्या माध्यमातून होणाऱ्या कथित आर्थिक लुटीविरोधात वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संतप्त नागरिकांनी महावितरणच्या 33/11 केव्ही कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढत स्मार्ट मीटरची प्रतिकात्मक होळी केली. येत्या 1 सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा थेट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
15 ऑगस्टलाच बत्ती गुल; ग्रामस्थ संतप्त
मोर्चादरम्यान बोलताना प्रशासक तथा सरपंच राजेश पाटील इंगोले यांनी महावितरणच्या भोंगळ कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. “15 ऑगस्टसारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी संपूर्ण गावात वीज गायब होती. या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले असून, न विचारता जबरदस्तीने लादलेले स्मार्ट मीटर त्वरित हटवले पाहिजेत,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:
मीटर वापसी बळजबरीने बसवलेले सर्व स्मार्ट मीटर काढून पूर्ववत जुने मीटर बसवावेत.
सुरक्षा उपाय: मुख्य रस्त्यावरील लोंबकळणाऱ्या तारा वर कराव्यात आणि मंदिर रोडवरील धोकादायक उघडी डीपी सुरक्षित ठिकाणी हलवावी.
वीज पुरवठा व बिल माफी सततचे लोडशेडिंग बंद करून वीज पुरवठा सुरळीत करावा तसेच आलेली अवाढव्य अतिरिक्त बिले रद्द करावीत.
ग्रामसभा मान्यता: गावात कोणतीही नवीन यंत्रणा राबवण्यापूर्वी ग्रामसभेची रीतसर परवानगी घ्यावी.
तीव्र आंदोलनाचा इशारा
आंदोलकांनी महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालत मागण्यांचे निवेदन दिले. त्यावर संबंधित अभियंत्यांनी सकारात्मक पावले उचलण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. मात्र, 1 सप्टेंबरपर्यंत ठोस कारवाई न झाल्यास तालुक्यातील इतर गावांना सोबत घेऊन विभागीय कार्यालयावर महामोर्चा काढू आणि वीजबिल बहिष्कार आंदोलन छेडू, असा इशारा कुरुंदेकरांनी दिला आहे.

