आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या पाठपुराव्याला यश; मार्डी येथे ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ उपकेंद्राचे दिमाखात लोकार्पण!
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या पाठपुराव्याला यश; मार्डी येथे ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ उपकेंद्राचे दिमाखात लोकार्पण!

लोकमंच टाईम्स
औंढा नागनाथ (विशेष प्रतिनिधी):
ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आणि तत्पर आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सतत कटिबद्ध असलेले वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून औंढा नागनाथ तालुक्यातील मार्डी येथे साकारण्यात आलेल्या ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र’ चे आज अत्यंत उत्साहात लोकार्पण करण्यात आले.
आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या हस्ते या नूतन आरोग्य मंदिराची फित कापून हे केंद्र ग्रामस्थांच्या सेवेत अर्पण करण्यात आले. या उपकेंद्रामुळे मार्डी परिसरातील शेकडो नागरिकांना आता प्राथमिक आरोग्य उपचारांसाठी दूर जाण्याची गरज उरणार नसून गावाजवळच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.
‘नागरिकांचे आरोग्य हीच माझी सर्वोच्च प्राथमिकता’
लोकार्पण प्रसंगी बोलताना आमदार राजूभैय्या नवघरे म्हणाले, “क्षेत्रातील प्रत्येक घटकाचा विकास आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हीच माझी लोकप्रतिनिधी म्हणून सर्वोच्च प्राथमिकता आहे. विकासाच्या प्रत्येक माध्यमातून जनसेवा आणि जनहिताला प्राधान्य देत मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी माझे प्रयत्न अविरत सुरू राहतील.”
उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांचा उत्साह
या दिमाखदार सोहळ्याला मार्डी परिसरातील ग्रामस्थ, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य केंद्राच्या उभारणीमुळे ग्रामस्थांनी आमदार राजूभैय्या नवघरे यांचे मनापासून आभार मानले असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

