जागतिक आदिवासी दिनानिमित्त वसमत येथे भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन; विविध क्षेत्रांतील समाजबांधवांची मोठी उपस्थिती
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

जागतिक आदिवासी दिनानिमित्त वसमत येथे भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन; विविध क्षेत्रांतील समाजबांधवांची मोठी उपस्थिती
(लोकमंच टाईम्स विशेष प्रतिनिधी):
वसमत
स्थानिक बिरसा मुंडा चौक येथे ९ ऑगस्ट रोजी ‘जागतिक आदिवासी दिन’ अत्यंत उत्साहात आणि मांगल्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्यक्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या अतुलनीय शौर्य, त्याग आणि संघर्षाच्या स्मृतींना उजाळा देत आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, अस्मिता आणि घटनात्मक हक्क जपण्याचा दृढ संकल्प या वेळी उपस्थितांनी केला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विविध मान्यवरांनी जागतिक आदिवासी दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. आदिवासी समाजाने शिक्षण, मजबूत संघटन आणि सामाजिक प्रगती हीच प्रगतीची सूत्रे मानून पुढे जाण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सर्व घटकांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान “जय बिरसा! जय जोहार! जय आदिवासी!” या जयघोषाने संपूर्ण बिरसा मुंडा चौक परिसर दुमदुमून गेला होता.
या प्रसंगी वसमत तालुक्यातील आदिवासी युवक, महिला, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने काळुराम कुरुडे, शेषराव बळवंते, तुकाराम बेले, सूर्यकांत कोठुळे, डॉ. चंद्रशेखर खोकले, कोंडबा पानबुडे, पंडित खोकले, बळीराम गिऱ्हे, अशोक वंजारे, शिवाजी कुरुडे, ग्यानोजी खरोडे, पांडुरंग गारोळे, हरिदास वंजारे, गुणाजी धुमाळे, शिवराम खुडे, सुभाष वागतकर, सुनील कऱ्हाळे, घोकसे, खुळे, गारोळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

