ताज्या घडामोडी

वाघी-सिंगीच्या पाणीप्रश्नावर आ. राजूभैया नवघरे ‘ॲक्शन मोड’मध्ये; ४ एकरात तळे उभारण्यासाठी ‘उद्याच’ सर्वेक्षण करण्याचे आदेश! सर्वेक्षणासह पाणी, वीज व शेत रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना

हरनामसिंग चव्हाण

वाघी-सिंगीच्या पाणीप्रश्नावर आ. राजूभैया नवघरे ‘ॲक्शन मोड’मध्ये; ४ एकरात तळे उभारण्यासाठी ‘उद्याच’ सर्वेक्षण करण्याचे आदेश!

वसमत (लोकमंच टाईम्स प्रतिनिधी):
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आमदार राजूभैया नवघरे यांनी मौजे वाघी व सिंगी (ता. वसमत) येथे सदिच्छा भेट देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यात गावातील मूलभूत प्रश्न, दुष्काळजन्य परिस्थिती आणि विकासकामांचा आढावा घेत आ. नवघरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरूनच फोन लावून कामांना गती देण्याचे कडक निर्देश दिले. विशेषतः वाघी येथील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी ४ एकर क्षेत्रात नवीन तळे उभारण्याबाबत उद्याच प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
४ एकरात नवीन तळे; उद्याच होणार प्रत्यक्ष सर्वेक्षण
दुष्काळामुळे वाघी व सिंगी परिसरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईबाबत ग्रामस्थांनी आमदारांकडे कैफियत मांडली. वाघी येथील ४ एकर जागेत नवीन तळे निर्माण झाल्यास गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो, ही बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली. यावर तात्काळ सकारात्मक पाऊल उचलत आ. नवघरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि “उद्याच गावात येऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी व सर्वेक्षण करा,” असे स्पष्ट आदेश दिले.
जलजीवन मिशन, विहीर अधिग्रहण आणि वीज प्रश्नावर अधिकाऱ्यांना सूचना
यावेळी ग्रामस्थांनी जलजीवन मिशन अंतर्गत रखडलेली कामे, विहीर अधिग्रहणातील तांत्रिक अडचणी आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या समस्या मांडल्या. दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना व शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी जलजीवनची अर्धवट कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत तसेच विहीर अधिग्रहण आणि वीजपुरवठ्याचे प्रश्न तातडीने निकाली काढावेत, अशा सक्त सूचना आ. नवघरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
शेत रस्ते व खडीकरणाच्या मागणीची तात्काळ दखल
शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला शेत रस्ता मजबूत करणे व त्याचे खडीकरण करण्याबाबत ग्रामस्थांनी आ. नवघरे यांना निवेदन सादर केले. या निवेदनाची तात्काळ दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून हे काम तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
विकासकामांबाबत ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त
आमदार नवघरे यांच्या माध्यमातून वाघी व सिंगी येथे झालेल्या दर्जेदार विकासकामांबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साकारलेला भक्कम रस्ता, नदीकाठची संरक्षण भिंत, बौद्ध वाड्यातील पेवर ब्लॉक आणि तरुण-मुलांसाठी उभारण्यात आलेली सुसज्ज जिम या कामांचा समावेश आहे. या कामांमुळे गावाच्या वैभवात भर पडल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या सदिच्छा भेटीदरम्यान वाघी व सिंगी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button