वसमतमध्ये मराठा आरक्षणाचा महादणका: ३०० ट्रॅक्टरच्या धडक मोर्चाने तहसील गजबजले; १० व्या दिवशी उपोषणाला कौठा-खांडेगाव सर्कलचा तुफान पाठिंबा
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमतमध्ये मराठा आरक्षणाचा महादणका: ३०० ट्रॅक्टरच्या धडक मोर्चाने तहसील गजबजले; १० व्या दिवशी उपोषणाला कौठा-खांडेगाव सर्कलचा तुफान पाठिंबा
वसमत
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण:
मराठा आरक्षणाच्या तीव्र लढ्याला बळ देण्यासाठी आणि वसमत तहसील कार्यालयासमोर गेल्या १० दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते रविकिरण वाघमारे यांच्या समर्थनार्थ कौठा व खांडेगाव वर्तुळातून ३०० हून अधिक ट्रॅक्टरचा ऐतिहासिक व धडक मोर्चा वसमत शहरावर धडकला. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो मराठा बांधवांनी आणि शेतकऱ्यांनी शेतीची कामे बाजूला सारून वसमत शहरात एल्गार पुकारला.
५ किलोमीटरच्या रांगा अन् भगवे वादळ
कौठा टी-पॉइंट आणि पांगरा मार्गे वसमत शहराच्या वेशीवर एकत्र आलेल्या ३०० ट्रॅक्टरच्या महामोर्चामुळे तब्बल ५ किलोमीटरपर्यंत भगव्या झेंड्यांचे आणि ट्रॅक्टरचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले. “एक मराठा, लाख मराठा”, “आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे” अशा गगनभेदी घोषणांनी वसमत शहर पूर्णपणे दणाणून गेले.
OBC प्रवर्गातून सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी
तहसील कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर आंदोलकांनी उपोषणकर्ते रविकिरण वाघमारे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. खालावलेल्या प्रकृतीनंतरही उपोषणावर ठाम असणाऱ्या वाघमारे यांच्या पाठीशी संपूर्ण तालुका उभा असल्याचे या मोर्चाने सिद्ध केले. “आमचा लढा कोणाही विरोधात नसून केवळ आमच्या मुलांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या हक्कासाठी आहे; सरकारने तात्काळ OBC प्रवर्गातून सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलेच पाहिजे,” अशी एकमुखी मागणी आंदोलकांनी लावून धरली.
वाहतूक ठप्प, पोलिसांचा चोख बंदोबस्त
एकाच वेळी ३०० ट्रॅक्टर मुख्य बाजारपेठेत दाखल झाल्याने सुमारे २ तास शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, वसमत पोलीस प्रशासनाने दाखवलेले नियोजन आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्तामुळे मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत पार पडला.
वसमत बंदचा इशारा
जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार नाही, असा इशारा देत गरज पडल्यास मुंबईचा मार्ग रोखण्याचा आणि येत्या काळात ‘वसमत बंद’ पुकारण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

