वसमतच्या प्रगतीचा कणा असलेल्या हमाल बांधवांचे प्रश्न थेट बांधावर; आमदार राजू नवघरे यांनी जपली नात्यांची वीण!
हरनामसिंग चव्हाण

वसमतच्या प्रगतीचा कणा असलेल्या हमाल बांधवांचे प्रश्न थेट बांधावर; आमदार राजू नवघरे यांनी जपली नात्यांची वीण!

वसमत (लोकमंच टाईम्स प्रतिनिधी):
वसमत शहराच्या जडणघडणीत आणि येथील व्यापार वृद्धिंगत करण्यात ज्यांच्या घामाचा सिंहाचा वाटा आहे, त्या मोंढ्यातील कष्टकरी हमाल बांधवांशी आमदार राजू भैय्या नवघरे यांनी आज ‘नाश्ता आणि चर्चा’ या अनोख्या उपक्रमांतर्गत थेट संवाद साधला. कोणताही राजकीय बडेजाव किंवा औपचारिकता न ठेवता, थेट हमाल बांधवांच्या पंगतीत बसून त्यांच्यासोबत नाश्ता करत त्यांचे प्रश्न जाणून घेणारे राजू भैय्या नवघरे हे वसमतचे पहिलेच आमदार ठरले आहेत.
वसमतमधील विविध घटकांतील नागरिकांशी थेट नाळ जोडण्यासाठी आमदार नवघरे यांनी या विशेष संवाद सत्राचे आयोजन केले होते. आजच्या बैठकीत शहरातील मोंढ्यात राबणाऱ्या हमाल बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी वातावरण अत्यंत भावूक आणि आपुलकीचे होते. आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी आपल्यासोबत बसून न्याहारी करत असल्याचे पाहून हमाल बांधव भारावून गेले होते. दिलखुलास गप्पा आणि मनमोकळ्या संवादाने ही मैफल खऱ्या अर्थाने रंगली.
अडचणी आणि अपेक्षांची थेट मांडणी
या हृदयस्पर्शी संवादात हमाल बांधवांनी आपल्या दैनंदिन कामाची पद्धत, मोंढ्यात काम करताना येणाऱ्या तांत्रिक व व्यावहारिक अडचणी, तसेच एक आमदार म्हणून राजू भैय्यांकडून असलेल्या अपेक्षा अत्यंत मोकळेपणाने मांडल्या. केवळ समस्या ऐकून न घेता, आमदार नवघरे यांनी प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या संवाद साधत त्यांच्या भावना समजून घेतल्या. हा संवाद केवळ एका आमदाराचा नागरिकांशी नव्हता, तर वसमतकर आणि त्यांच्या ‘हक्काच्या राजू भैय्यांमधील’ एक कौटुंबिक गप्पांची मैफल ठरला.
कष्टकऱ्यांचा सन्मान हीच वसमतची संस्कृती
याप्रसंगी बोलताना आमदार राजू भैय्या नवघरे म्हणाले की, “वसमत घडविण्यात प्रत्येक घटकाचा समान वाटा आहे. आज आपली बाजारपेठ आणि व्यापार समृद्ध होण्यामागे या हमाल बांधवांचे कष्ट आणि मोठा वाटा आहे. वसमतकर या कष्टकऱ्यांचे मोल नक्कीच जाणतात. आपल्या शहराची ही आपुलकीची आणि माणुसकीची संस्कृती अशीच टिकवून ठेवणे आणि ती अधिक वृद्धिंगत करणे, ही आपल्या सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे.”
त्यांच्या या साधेपणाचे आणि कष्टकऱ्यांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे संपूर्ण वसमत शहरातून कौतुक होत आहे.

