‘समान काम, समान वेतना’साठी वसमत न्यायालयात कर्मचाऱ्यांचे काळी फित लावून मूक आंदोलन; निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

‘समान काम, समान वेतना’साठी वसमत न्यायालयात कर्मचाऱ्यांचे काळी फित लावून मूक आंदोलन; निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
वसमत:
मुंबई उच्च न्यायालयाच्या धर्तीवर राज्यातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना ‘समान काम, समान वेतन’ या न्यायानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी वसमत न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी, १६ सप्टेंबर रोजी तीव्र संताप व्यक्त केला. प्रलंबित प्रस्तावावर शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी हातात काळी फित बांधून प्रशासनाचा जोरदार निषेध नोंदवला.
महाराष्ट्र राज्यातील सर्व न्यायालयीन संघटनांनी १२ फेब्रुवारी २०२४ रोजी (जावक क्रमांक ८/२०२४) आर्थिक लाभाचा आणि वेतनवाढीचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. मात्र, महिने उलटूनही यावर कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या हाकेला प्रतिसाद देत वसमत न्यायालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मूक आंदोलनाचे हत्यार उपसले.
कामकाज सुरू ठेवून नोंदवला निषेध
न्यायालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची व पक्षकारांची गैरसोय होऊ नये, याची पूर्ण खबरदारी कर्मचाऱ्यांनी घेतली. दैनंदिन न्यायालयीन कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू ठेवत, केवळ काळी फित लावून कर्मचाऱ्यांनी अत्यंत शांततापूर्ण आणि संयमी मार्गाने शासनाचे लक्ष वेधले.
इशारा:
दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या मागणीवर शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास, राज्य महासंघाच्या आदेशानुसार आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र आणि आक्रमक केले जाईल, असा स्पष्ट इशारा वसमत येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

