वसमत शहरात व्हायरल इन्फेक्शनचा उद्रेक: खासगी दवाखाने फुल्ल, आरोग्य यंत्रणा मात्र ढिम्म!
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमत शहरात व्हायरल इन्फेक्शनचा उद्रेक: खासगी दवाखाने फुल्ल, आरोग्य यंत्रणा मात्र ढिम्म!
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
वसमत (विशेष प्रतिनिधी):
वसमत शहर आणि परिसरात सध्या बदलत्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन (साथीचे आजार) आणि तापाच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरातील गल्लीबोळात असलेल्या लहान-मोठ्या दवाखान्यांपासून ते मोठ्या हॉस्पिटलपर्यंत सर्वत्र रुग्णांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे आरोग्य विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडी, ताप, खोकला आणि अंगदुखीच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ओपीडीमध्ये रुग्णांना उपचारासाठी तासनतास ताटकळत उभे राहावे लागत असून, अनेक दवाखान्यांमध्ये बेडही शिल्लक राहिलेले नाहीत. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी ओसंडून वाहत आहे.
आरोग्य विभागाचा कारभार ढासळला?
एकीकडे सर्वसामान्य नागरिक तापाने फणफणत असताना दुसरीकडे सरकारी आरोग्य यंत्रणा मात्र ढिम्म असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना किंवा प्रतिबंधात्मक उपाय (जसे की धुर फवारणी, पाणी तपासणी) राबवली जात नाही. आरोग्य विभागाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून “हा आरोग्य विभागाचा बोजवारा नाही तर काय?” असा थेट सवाल आता वसमतकर विचारत आहेत.
नागरिकांची मागणी:
शहर व परिसरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य विभागाने तात्काळ विशेष वैद्यकीय शिबिरे आयोजित करावीत, स्वच्छता अभियान राबवावे आणि औषध पुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.

