बारीपुरवाडी येथे स्वातंत्र्य दिन व शाहीर वामनदादा कर्डक यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

बारीपुरवाडी येथे स्वातंत्र्य दिन व शाहीर वामनदादा कर्डक यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी
लोकमंच टाईम्स:हरनामसिंग चव्हाण
बारीपुरवाडी (प्रतिनिधी):
येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात १५ ऑगस्ट रोजी देशाचा स्वातंत्र्य दिन आणि लोकशाहीर, प्रख्यात शाहीर वामनदादा कर्डक यांची १०४ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
या दुहेरी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विनोद कांबळे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ठोके सर आणि प्राथमिक शिक्षक कातोरे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून झाली.
शाहीर वामनदादा कर्डक यांच्या स्मृतींना उजाळा
कार्यक्रमात बोलताना वाचनालयाचे अध्यक्ष विनोद कांबळे यांनी शाहीर वामनदादा कर्डक यांची एक सुंदर कविता सादर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुख्याध्यापक ठोके सर यांनी वामनदादांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला, तसेच त्यांनी ‘तूप दिवे’ हे प्रबोधनात्मक गीत गाऊन उपस्थितांमध्ये नवा उत्साह निर्माण केला.
या वेळी प्राथमिक शिक्षक कातोरे सर यांनी आपल्या मनोगतातून १५ ऑगस्ट या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व विशद केले आणि वामनदादांच्या क्रांतिकारी विचारांची माहिती उपस्थितांना दिली.
या सोहळ्याला गावातील नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या पुढाकाराने झालेला हा कार्यक्रम आनंदी वातावरणात आणि वैचारिक प्रबोधनाने यशस्वीरीत्या संपन्न झाला.

