वसमतमधील दुर्लक्ष! गवळी मारोती मंदिर ते झेंडा चौक रस्त्यावरील लाखो रुपये खर्चाची झाडे वाळण्याच्या मार्गावर; नगरपरिषदेच्या अनास्थेवर नागरिकांचा संताप
हरनामसिंग चव्हाण

वसमतमधील दुर्लक्ष! गवळी मारोती मंदिर ते झेंडा चौक रस्त्यावरील लाखो रुपये खर्चाची झाडे वाळण्याच्या मार्गावर; नगरपरिषदेच्या अनास्थेवर नागरिकांचा संताप
![]()
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
वसमत (विशेष प्रतिनिधी):
वसमत शहरातील मध्यवर्ती आणि अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा गवळी मारोती मंदिर ते झेंडा चौक, या मुख्य रस्त्यावरील दुभाजकावर (डिवायडर) लावलेली हिरवीगार झाडे आता पाण्यासाठी तडफडून वाळू लागली आहेत. पावसाळा सुरू असूनही पुरेसा पाऊस न पडल्यामुळे सध्या परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, ऐन उन्हाळ्यासारखे तीव्र चटके जाणवत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत नगरपरिषदेने वेळेतच पाणी दिले नाही, तर ही सर्व झाडे १०० टक्के वाळून खाक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लाखो रुपयांचा खर्च पाण्यात?
शहराचे सुशोभीकरण व्हावे आणि पर्यावरण संतुलित राहावे या उद्देशाने नगरपरिषदेने या मुख्य रस्त्यावरील दुभाजकावर १० ते १२ फूट उंच, हिरवीगार झाडे लावून मोठे सुशोभीकरण केले होते. या प्रकल्पावर प्रशासनाने लाखो रुपयांचा निधी खर्च केला. सुरुवातीला ही झाडे अत्यंत आकर्षक आणि हिरवीगार दिसत होती. मात्र, आता योग्य देखभालीअभावी आणि पाण्याचा थेंबही मिळत नसल्याने ही झाडे सुकू लागली आहेत.
उन्हाचे चटके अन् नगरपरिषदेची झोप!
यंदा पावसाने मारलेल्या दडीमुळे शहरात तीव्र उष्णता आणि दुष्काळाची झळ बसत आहे. निसर्गाच्या या अवकृपेमुळे झाडांचे संगोपन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. “लाखो रुपये खर्च करून झाडे लावायची स्टंटबाजी करायची, पण त्यांना नियमित पाणी देऊन वाचवण्याची वेळ येते तेव्हा प्रशासन गप्प का बसते?” असा संतप्त सवाल वसमतकर नागरिक विचारत आहेत.
टँकरद्वारे पाणी देण्याची तातडीची मागणी
रस्त्यावरील ही दुर्मिळ व मोठी झाडे वाचवायची असतील, तर नगरपरिषदेने कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ तोडगा काढणे आवश्यक आहे. नगरपरिषदेने तातडीने टँकरची व्यवस्था करून या सर्व झाडांना नियमित पाणी द्यावे, अशी जोरदार मागणी वसमत शहरातील सुजाण नागरिक व पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. जर वेळेत पाणी दिले नाही, तर लाखो रुपयांचा झालेला खर्च पूर्णपणे पाण्यात जाईल आणि प्रशासकीय हलगर्जीपणामुळे ही झाडे कायमची नष्ट होतील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

