प्रचाराच्या व्हिडिओत धार्मिक स्थळे, चिन्हांचा वापर टाळा; निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन
हरनामसिंग चव्हाण

प्रचाराच्या व्हिडिओत धार्मिक स्थळे, चिन्हांचा वापर टाळा; निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
छत्रपती संभाजीनगर:
निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा आढावा घेणारे व्हिडिओ आणि जाहिराती तयार करताना भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे व नियमांचे काटेकोर पालन करावे. व्हिडिओ तयार करण्यापासून त्यांना आवश्यक प्रमाणन मिळेपर्यंतची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने, प्रतिबंधित बाबी आधीच टाळल्यास प्रमाणनाची प्रक्रिया सुलभ होईल, असे आवाहन ०५ – औरंगाबाद पदवीधर निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.
प्रचारासाठी वृत्तपत्रे, प्रचाररथ, सोशल मीडिया रील्स, रेडिओ, एफएम वाहिन्या, बल्क एसएमएस, इंटरनेट संकेतस्थळे अशा विविध माध्यमांचा वापर केला जातो. या सर्व जाहिराती व व्हिडिओंचे ‘माध्यम प्रमाणन व संनियंत्रण यंत्रणे’कडून (MCMC) पूर्वप्रमाणन करून घेणे बंधनकारक आहे. तसेच वृत्तपत्रांमधील जाहिरातींसाठी मतदानाच्या आधीच्या शेवटच्या दोन दिवसांत नियमांनुसार पूर्वप्रमाणन घेणे आवश्यक आहे.
प्रचाराच्या व्हिडिओत ‘या’ बाबी टाळणे आवश्यक:
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार व्हिडिओ तयार करताना खालील १२ प्रमुख बाबींचा समावेश करू नये:
१. मंदिर, मशीद, गुरुद्वारा किंवा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळांची दृश्ये वापरू नयेत.
२. इतर राजकीय पक्षांवर आरोप करण्याऐवजी उमेदवाराने स्वतः केलेल्या कामांची माहिती द्यावी.
३. एकमेकांच्या खासगी आयुष्याबाबत आरोप करू नयेत किंवा असभ्य भाषेचा वापर करू नये.
४. विरोधी पक्षांविरुद्ध आक्षेपार्ह टीका-टिप्पणी किंवा हेतुपुरस्सर आरोप करू नयेत.
५. सैन्याची किंवा सैन्य अधिकाऱ्यांची छायाचित्रे वापरू नयेत.
६. अन्य कोणत्याही देशाविरुद्ध आक्षेपार्ह आरोप करू नयेत.
७. विशिष्ट जात, धर्म किंवा पंथाविरुद्ध आरोप करणारा अथवा धार्मिक तेढ निर्माण करणारा मजकूर वापरू नये.
८. कोणत्याही व्यक्तीची मानहानी किंवा अवहेलना होईल, अशी दृश्ये अथवा मजकूर वापरू नये.
९. न्यायालयाचा अवमान होईल, असे चित्रण किंवा मजकूर टाळावा.
१०. देशाच्या सार्वभौमत्वाचा किंवा राष्ट्रीय एकात्मतेचा अवमान करणारी सामग्री वापरू नये.
११. कोणत्याही व्यक्तीचे नाव घेऊन तिच्यावर हेतुपुरस्सर आरोप करू नयेत किंवा अपमान करू नये.
१२. सिनेमॅटोग्राफ कायदा, १९५२ मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे प्रसारण टाळावे.
कार्यक्रम व जाहिरात संहितेचे पालन अनिवार्य
कार्यक्रम संहिता: अभिरुचीहीन किंवा असभ्य दृश्ये, धार्मिक/जातीय तेढ, अंधश्रद्धा, हिंसेला प्रोत्साहन, अश्लीलता, बदनामीकारक माहिती, न्यायालयाचा अवमान, राष्ट्रपती किंवा न्यायपालिकेविषयी आक्षेपार्ह मजकूर आणि महिलांचे व बालकांचे विकृत चित्रण असलेल्या प्रसारावर पूर्णपणे बंदी आहे.
जाहिरात संहिता: भारतीय राज्यघटनेचा अवमान करणाऱ्या, वंश/जात/वर्ण/पंथाचा उपहास करणाऱ्या, गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा राज्यमुद्रा व राष्ट्रीय नेत्यांच्या चित्रांचा गैरवापर करणाऱ्या जाहिरातींना परवानगी दिली जाणार नाही. तसेच तंबाखूजन्य व मादक पदार्थांच्या जाहिरातींवरही पूर्ण बंदी आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वप्रमाणनाची सुविधा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती’ स्थापन करण्यात आली आहे. सर्व उमेदवार व राजकीय पक्षांनी आपल्या जाहिराती व व्हिडिओ या समितीकडून प्रमाणित करून घ्यावेत आणि निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.

